एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना आवाहन

 सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना आवाहन.



उरण / विठ्ठल ममताबादे 

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तिसऱ्या मुंबईच्या निमित्ताने उरण पनवेल, पेण तर चौथ्या मुंबईच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील जमींनीना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना, जमीन मालकांना विविध प्रलोभने, आमिष दाखवून मोठया प्रमाणात जमीन कमी किंमतीत विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा शेतकऱ्यांची या बाबतीत मोठया प्रमाणात फसवणूक सुद्धा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना आपल्या पिकत्या जमिनी विकू नका, सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने २००३ पासून पाच वेळा उरण पनवेल पेण विभागात तसेच इतर विभागात विविध प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला आहे. २००६ साली तर रिलायन्सच्या महामुंबई एसईसडेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी कवडीमोल किमतीने बळकाविण्याचा आणि स्थानिक भूमीपुत्र असलेल्या शेतकऱ्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला. त्या विरोधात समितीने पाच वर्षे न्यायालयात आणि रस्त्यावर तीव्र लढा दिला आणि त्या प्रकल्पालाच हद्दपार करुन टाकले. तो लढा ऐतिहासिक होता.

आता पुन्हा तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारने चंग बांधला आहे. त्यासाठी काही दलाल शेतकऱ्यांची दिशाभूल करुन त्यांना जमीन विकण्यास भाग पाडत आहेत; तरुणांना मोहाच्या जाळ्यात अडकवत आहेत. कृपया त्यास बळी पडू नका.

सभोवतालच्या विकासामुळे आणि विशेषतः अटल सेतुमुळे उरण पनवेल विभागातील जमिनीचे मूल्य अमाप वाढले आहे.  लगतच्या जेएनपीटी आणि नवी मुंबई परिसरात आज जमिनीचा एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपयांच्या वर गेला आहे. इतकेच काय एनएचआयए महामार्ग बाधित शेतकरी न्यायालयात गेल्यामुळे सरकारनेच त्यांना एका गुंठ्याला अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार रुपयांचा (५८,८०,०००/-) मोबदला दिला आहे. (जिल्हाधिकारी, रायगड यांचा आदेश क्र. भूसंपादन/टें- ६ दर निश्चिती NH 4B/२०१७ दि. २०.११.२०१७).

शेतकरी बांधवांनो, आपल्या विभागात जमिनी खरेदी करणारे बाहेरचे लोक (पार्टीवाले) वेडे नाहीत. आपल्या जमिनी स्वस्तात घेवून, भविष्यात तेच फायदा उठविणार आहेत. कारण काही वर्षांनी येथील जमिनीला प्रचंड भाव मिळणार आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. म्हणून आपल्या वाडवडिलांपासून आपल्या उपजिवीकेचे साधन असणाऱ्या जमिनी दोन-चार लाख गुंठा भावाने विकू नका, दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका! आपल्याला, विशेषतः तरुणांना आमची कळकळीची विनंती आहे की, आपल्या आजोबा-पणआजोबांनी जीवापाड जोपासलेली आपली काळी आई कवडीमोल किमतीला विकू नका, जरा धीर धरा, एमएमआरडीए विरोधी संघर्षात सामील व्हा, संघर्ष करून आपण न्याय मिळवू हा आम्हाला विश्वास आहे. कृपया समिती तर्फे काढण्यात आलेले पत्रक सर्वांनी वाचा आणि दुसऱ्यांनाही वाचायला द्या.असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना, जमीन मालकांना करण्यात आले आहे.

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे प्रमुख मार्गदर्शक बी. जी. कोळसे-पाटील माजी न्यायमूर्ती,कायदेशीर सल्लागार ऍड . मेघनाथ पाटील,ऍड डी. के. पाटील,एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगडचे अध्यक्ष सुधाकर पाटील

कार्याध्यक्ष संतोष ठाकूर, सरचिटणीस रुपेश पाटील,उपाध्यक्ष लवेश म्हात्रे,गोपाळ जोशी, चंद्रशेखर ठाकूर,ऍड भास्कर पाटील,एम.के. म्हात्रे,हिरामण मोकल,समन्वयक ऍड सत्यवान भगत,खजिनदार रोशन ठाकूर,कायदेशीर सहाय्यक ऍड दत्तात्रेय नवाले, ऍड . प्रसाद पाटील, ऍड निनाद नाईक, ऍड धीरज डाकी, ऍड.योगेश म्हात्रे,सल्लागार महेंद्र ठाकूर,सुरेश पाटील,डॉ. सुभाष घरत,रमाकांत जोशी,विनोद म्हात्रे, बी. एन. डाकी ,विद्याधर मुंबईकर, रमाकांत पाटील,विभाग प्रमुख-राजाराम जोशी,मनोज पाटील,प्रशांत म्हात्रे,प्रकाश शिवकर,सहसचिव-प्रकाश पाटील,सहखजिनदार-जयवंत पाटील,श्याम मोकाशी, विलास गावंड आदी पदाधिकारी सदस्यांनी या विषयावर नेहमी संप आंदोलन, विविध बैठका, कायदेशीर पत्रव्यवहार करून शेतकरी वर्गात जनजागृती केली आहे.

---------