जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने दि.31 डिसेंबर 2024 रोजी "थर्टी फस्ट" चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. दि.28 डिसेंबर 2024 व दि.29 डिसेंबर 2024 रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दुष्टीकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता दि.28 डिसेंबर 2024 सकाळी 06.00 ते दि.29 डिसेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग कमांक 166-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.
---------