पत्रकारांच्या जिल्हा कार्यालयासाठी खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणा-या पत्रकारांकडून रायगड जिल्ह्यातील अलिबाग अथवा महत्वाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यालय असावे,यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ,मुंबई तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे लेखी निवेदन देवून मागणी केली.
यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांच्या हिताचा निर्णंय घेवून मी सहकार्य करणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर दिक्षाभुमी ते मुंबई मंत्रालय अशी 26 दिवसांची संवाद यात्रा सर्व जिल्यातून काढली होती.
या संवाद यात्रेचे सर्व जिल्यात पत्रकारांनी स्वागत करुन राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी 24 मागण्या मांडल्या.
यातील महायुती सरकारने पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेची मागणी मान्य केली.ज्यामुळे पत्रकारांच्या समस्या सुटण्याची वाट मोकळी झाली आहे.
स्वतंत्र महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना आर्थिक सुरक्षा,विमा संरक्षण,विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे.पत्रकार संघाच्या उर्वरित मागण्या तातडीने पुर्ण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,सरचिटणिस डाॅ.विश्वासराव आरोटे,रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून आभार मानत,पत्रकारांच्या उर्वरित मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.
जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांनी रायगड जिल्ह्यात अलिबाग तथा महत्वाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यालय असावे अशी मागणी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली आहे.
---------